औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे मागील चार दिवसांपासून एका वानराने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत त्याने ५५ जणांना चावा घेतला असून, वानराला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी रात्रीपर्यंत वानर हाती लागले नाही. उलट त्या उपद्रवी वानराच्या मदतीला आणखी ३० वानर सोनखेमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सोनखेडमध्ये वनविभागाची टीम शुक्रवारपासुन तळ ठोकुन आहे. उपद्रवी वानरास पकडायला गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर वानराने हल्ला करीत जखमी केले होते. शनिवारी या वानराचा ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी उपद्रवी वानराच्या मदतीला ३० वानरांची टोळी आली. त्यामुळे उपद्रवी वानर शोधणे वनविभागाला जिकरीचे झाले. दरम्यान, औरंगाबाद येथील रेस्क्यू पथक सायंकाळी उशिरा गावामध्ये दाखल झाले असून, निलंगा तहसीलदार अनुप पाटील, पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे यांनी गावास भेट देऊन पाहणी केली. गावामध्ये एक पोलीस पथक, एक रुग्णवाहिका वन विभागाच्या मदतीला ठेवण्यात आलेली आहे. तर औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे बिट अंमलदार विष्णू गिते, पाेलिस अंमलदार शिवाजी जेवळे, मारुती केंद्रे यांचे पथक बंदाेबस्तासाठी तैनात आहे.
औरंगाबादच्या रेस्क्यू टिमला केले पाचारण...शुक्रवारी सायंकाळी वानराला ताब्यात घेण्यासाठी औरंगाबाद येथील रेस्क्यू टिम सोनखेडमध्ये दाखल झाली आहे. लवकरच वानराला ताब्यात घेऊ असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. गिते यांनी सांगितले.
तीन वन कर्मचारी जखमी...हल्लेखाेर वानरास पकडायला गेलेल्या वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना वानराने जखमी केले आहे. यामध्ये तुकाराम गणपत कांबळे, बालाजी गाेपाळ केंद्रे, पंडित लासुने यांचा समावेश असून, त्यांना उपचारासाठी निलंगा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.