लातूर : आठ वर्षाच्या मुलासमाेरच धारदार चाकूने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना १ नाेव्हेंबर २०१८ राेजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील तुंगी (बु.) येथे घडली. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आठ वर्षाच्या मुलाने दिलेल्या साक्षीवरुन लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आराेपी पतीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा सरकारी वकिल संताेष देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुंगी येथील महेबूब हुसेन मुळजे (२५) आणि पत्नी साबिया यांच्यात सतत भांडण हाेत असत. चारित्र्यावर संशय घेत अनेकदा त्याने पत्नी साबियाला मारहाणही केली हाेती. दरम्यान, या जाेडप्याला तीन अपत्य असून, माेठा मुलगा आठ वर्षाचा आहे तर इतर दाेन त्याच्यापेक्षा लहान आहेत. १ नाेव्हेंबर २०१८ राेजी सकाळी पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी पतीने महेबूब याने धारधार चाकूने गळा चिरुन पत्नीची हत्या केली. हा सर्व प्रकार माेठ्या मुलाच्या डाेळ्यासमाेरच घडला. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात गुरनं. २०९ / २०१८ कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता.
या प्रकरणाचा तपास पाेलीस उपनिरीक्षक एस.डी. जाधव, सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी करून आराेपीविराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. हे प्रकरण लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. काेसमकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. यात सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. मयत साबिया आणि आराेपी महेबूब यांच्या आठ वर्षाच्या मुलाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आराेपी महेबूब हुसेन मुळजे याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संताेष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आर.टी. राठाेड, पाेलीस कर्मचारी विजया पकाले, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.