लातूर : रात्रीचा काळाेख... पहाटेचे १:४५ वाजलेले... राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, जवान गस्तीवर असताना एका हाॅटेलवर चहा घेत हाेते. दरम्यान, दाेन महिला एका ऑटाे चालकाला काकुळतीने विनवणी करीत हाेत्या... दादा ऐका ना हाे... आमची बाई बाळंतपणासाठी तडफडत आहे. आम्हाला दवाखान्यात साेडा ना...यावर ऑटाेचालकाने कुठलीही दाद न देता ताे सुसाट गेला. हा सगळा प्रसंग गस्तीवर असलेले निरीक्षक आर.एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले आणि जवान संताेष केंद्रे यांच्या नजरेला पडला. त्यांनी तातडीने वेळ आणि प्रसंग ओळखला... हातातला चहाचा ग्लास झटक्यात खाली ठेवला अन् ते त्या महिलांकडे गेले.
विचारपूस केली असता, त्या महिलांनी सांगितले, ‘आमच्या घरात एक महिला गराेदर आहे. तिला प्रसववेदना हाेत आहेत. तिला लगेच दवाखान्यात न्यावे लागणार आहे साहेब... काय करावं एकबी गाडी, ऑटाे थांबत नाही बघा...’ यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर.एम. चाटे आणि गणेश गाेले यांनी तातडीने आपले वाहन त्या महिलेच्या घरासमाेर उभे केले. महिलेला वाहनात घेत ते जांब-जळकाेटच्या दिशेने निघाले. प्रसववेदनेने विव्हळत असलेल्या महिलेची प्रसूती वाटेतच झाली आणि तिला पुत्ररत्न झाले. त्यांनी बाळंत महिलेला जांब (ता. मुखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले.
डाॅ. माया कापसे यांनी तातडीने बाळंत महिला आणि बाळावर उपचार केले. बाळ आणि बाळंत महिलेची तब्येत उत्तम आहे. वेळेवर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने उपचारही करता आले, असे डाॅ. कापसे म्हणाल्या. रात्रीच्या काळाेखात कर्तव्यावर असलेल्या खाकी वर्दीने माणुसकीचे दर्शन घडविल्याने महिलेची प्रसूती सुखरूप झाली. याबद्दल लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी त्यांचा सत्कार केला.