'जीएसटी'च्या माध्यमातून देशाला लुटण्याचे काम सुरु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
By राजकुमार जोंधळे | Published: May 2, 2024 01:28 AM2024-05-02T01:28:17+5:302024-05-02T01:28:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पटोले हे लातूर जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर बुधवारी आले होते. दरम्यान, त्यांनी रात्री उशिरा काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
लातूर : गत दहा वर्षांच्या काळात जीएसटी कायद्याच्या माध्यमातून देशातील नागरिकांना लुटण्याचे काम केले जात आहे. सार्वजनिक उपक्रम विक्री करुन देशाला कंगाल केले जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना बुधवारी रात्री बोलताना केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पटोले हे लातूर जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर बुधवारी आले होते. दरम्यान, त्यांनी रात्री उशिरा काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. त्यामुळे यावेळी भाजपचा पराभव अटळ आहे. यावेळची निवडणूक आता जनतेनीच मनावर घेतली आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला आता लोक वैतागले आहेत. आपले पंतप्रधान खोटे बोलण्यात एक्सपर्ट आहेत. त्याच्याकडे दहा वर्षात काय केले हे सांगण्यासाठी कुठलेही मुद्दे नाहीत. ते गुजरातचे पंतप्रधान आहेत की देशाचे? असा प्रश्न पडतो. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यापेक्षा दहा वर्षांत देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय केले ते सांगावे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होती., अशीही टीका त्यांनी केली.
यावेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष अँड. किरण जाधव, मोईज शेख, राजा मणियार, सुनील बसपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
४८ जगावर विजय मिळवण्याचा दावा... -
लोकसभा निवडणुकीचा आता तिसरा टप्पा सुरु होत आहे. भाजप विरोधात जनतेत चीड, राग आहे. तरुण पिढी त्यांच्या विरोधात असून, महाराष्ट्रातील ४८ जगावर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
शेतकरी आत्महत्यावर भाजपवाले का बोलत नाहीत? -
राज्यात महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भजपवाले यावर अजिबात बोलत नाहीत. केवळ थापा मारुन वेळ मारुन नेत आहेत. नेमका विकास काय काय केला, हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.
भूलथापांना वैतागलेली जनता भाजपला धडा शिकवेल... -
दहा वर्षांपासून भाजपकडून जनतेला खोटे बोलून फसविण्यात आले आहे, या भूलथापांना वैतागलेली जनताच आता भाजपला धडा शिकवणार आहे, असेही ते म्हणाले.
मोठ्यांना, उद्योगपतींना सवलती, तर जनतेला मात्र जीएसटी टॅक्स... -
देशातील मोठ्यांना, उद्योगपतीना सोडायचे आणि जनतेला टॅक्स लावायचे, अप्रत्यक्षपणे जीएसटीचा भार सामान्य लोकांवर टाकायचा , त्याद्वारे देशाला लुटले जात आहे, त्यामुळे आता ४०० पार नव्हे सरकार तडीपार.. असा घणाघात नाना पटोले यांनी केला.