विहीरीच्या पाण्याच्या कारणावरुन मारहाण
लातूर : तु सामाईक विहीरीचे पाणी द्यायचे नाही म्हणून धक्का बुक्की करत तोंडावर चापटाने मारहाण केली. तसेच फावड्याच्या तुंब्यांने डोक्यात मारहाण केल्याची घटना मलकापूर शिवारात घडली. याप्रकरणी फिर्यादी अमर मारोती पवार यांच्या तक्रारीवरुन राजकुमार मारोती पवार यांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना शिंदे करीत आहेत.
वाकडे का बोलत आहेस म्हणून मारहाण
लातूर : गाड्यावर नारळ विक्री करीत असताना तु मला वाकडे का बोलत आहेस असे म्हणून शिवीगाळ करीत कटरने पायाच्या मांडीवर मारुन जखमी केल्याची घटना पत्तेवार चौक उदगीर येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी खिझर मौलासाब शेख यांच्या तक्रारीवरुन गौस मुर्तुजा गोलंदाज रा. किल्ला गल्ली उदगीर यांच्या विरुद्ध उदगीर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गायकवाड करीत आहेत.
विभागीय युवा संसद स्पर्धेत दयानंद महाविद्यालयाचे यश
लातूर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद व युवक बिरादरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे विभागीय युवा संसद स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये दयानंद महाविद्यालयाच्या संघाने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषक मिळविले. यामध्ये दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान व विधी महाविद्यालयातील राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये दयानंद महाविद्यालयाच्या टीमचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. संतोष पाटील यांनी केले. यावेळी डॉ.विलास कोमटवाड, प्रा.महेश जंग्गापल्ले प्रा. शैलजा दामरे यांची उपस्थिती होती.
अब्दुल शेख यांचा लातूरात सत्कार
लातूर - येथील अब्दुल समद शेख यांचा सय्यद अझहर, मुश्ताक सौदागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खदिर मणियार, गणेश देशमुख, विजय धुमाळ, मसरूर पटेल, एजाज मनियार आदींसह नागरीकांची उपस्थिती होती. अब्दुल समद शेख यांनी मुस्लिम विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर काम केले असल्याचे मुश्ताक सौदागर यांनी यावेळी सांगितले.
प्रविण शिवनगीकर यांना पुरस्कार प्रदान
लातूर : येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे कुलसचिव प्रविण रंगनाथ शिवनगीकर यांना श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थे च्यावतीने रामनाथजी भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड. आशिष बाजपाई, चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य एस.ए. वरदन, बी.के. भालेराव, विद्या साळवे, विक्रम माने, जयंता भांगडीया, देवयानी देशपांडे, विनोद चव्हाण, प्रविण सावरगावकर, सरिता खंडेलवाल, सतीश जाधव, अमित होणमाळे, शैलेंद्र डावळे आदींची उपस्थिती होती.