ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 01 - जन, जल, भूमी, जंगल आणि जीव-जंतू या सर्वांचा स्वभाव म्हणजे देशाची संस्कृती आहे. त्यात माणसांचा जन्म इतरांपेक्षा वेगळा आहे. माणसांनी सहनशीलता ठेवून समाजासाठी परोपकार केले पाहिजेत. एकांतात राहून आत्म समाधान आणि लोकांतात राहून परोपकार ही माणसांची वृत्ती असली पाहिजे. देशातील वेगवेगळ्या सांप्रदायाची हीच शिकवण आहे. सांप्रदाय अनेक आहेत, पण धर्म एकच आहे. तो म्हणजे मानवधर्म आहे. दोन धर्म असूच शकत नाहीत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर शांतीवीर शिवाचार्य महाराज, बसवलिंग पट्टदेवरू महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासह दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, डॉ. अशोक कुकडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतात विविध पंथ आणि सांप्रदाय असले तरी त्या सर्वांचा स्वभाव एक आहे. ते मातृभूमीशी जोडले गेले आहेत. प्रत्येक सांप्रदायातून मानवी जीवनाच्या सुखाचाच विचार मांडला जातो. ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे जगाच्या कल्याणाची ताकद या संस्कृतीमध्ये आहे. मानवी जीवनापेक्षा पशु जीवन मात्र वेगळे आहे. पशुजीवन स्वार्थी असते. मरणार की नाही, माहीत नाही. भूक लागली की पशु वाट्टेल ते करतात. पाप आहे हे त्याला कळत नाही. माणसांचे तसे नाही. माणूस विचारी आहे. मग माणूस जर पशुसारखा स्वार्थी वागायला लागला, तर परोपकार कसा होईल, असा सवाल उपस्थित करीत मोहन भागवत म्हणाले, स्वार्थी जगणे ही विकृती आहे आणि विकृती म्हणजे राक्षसाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीनुसार सर्वांच्या विकासासाठी जगले पाहिजे. माणूस भितीपोटी, उपकारापोटी, भयापोटी चांगला वागतो, हा स्वार्थच आहे. परंतु, आपली आई मुलांप्रती स्वार्थीपणाने वागत नाही. स्वत: भुकेली राहून इतरांचा विचार करते. स्वार्थाच्या पलिकडे जाऊन इतरांचा विचार करणे ही तिची संस्कृती आहे. त्यानुसार आपणही एकमेकांना सहन करून चांगले काम करून विविधतेतून एकता टिकविणे ही आपली संस्कृती अधिक वृद्धिंगत केली पाहिजे. एकांतातून आत्मसाधना आणि लोकांतातून परोपकार हे आपले व्रत आहे, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.
भारतातील मुस्लिम सांप्रदायाचा माणूस असो की, ख्रिश्चन सांप्रदायाचा असो, भारतातील या सर्व सांप्रदायांचा स्वभाव एक आहे, तो म्हणजे मानवी सुखाचा. हीच आपली संस्कृती आहे. एकतेच्या मार्गाने चालण्याचीच शिकवण या सांप्रदायाने दिली असून, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासारखे धर्मगुरु त्यासाठीच जीवन समर्पित करीत असल्याचे ते म्हणाले.
महाराजांचे जगणे आपल्यासाठी आदर्श...
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आपले गुरु आहेत. त्यांचे जगणे हे आपण कसे जगावे, यासाठी मार्ग दाखविणारे आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज ईश्वराचीच देण आहे. त्यामुळे त्यांना प्राणापलिकडे जपले पाहिजे, असे गौरवोद्गार सरसंघचालक भागवत यांनी काढले.