लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात तीन जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान, लोकसभेसाठी एकुण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यात छाननीत पाच जणांचे अर्ज बाद झाले होते. आता तिघांनी माघार घेतल्याने २८ जण उमेदवार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पत्रपरिषदेत सोमवारी दिली.
लातूर लोकसभा मतदासंघात उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्याने आता निवडणूक आयोग मतदानासाठी आवश्यक साधनसामुग्री जुळविण्याच्या कामाला लागले आहे. २२ एप्रिल रोजी माघार घेण्याचा शेवटचा होता. साेमवारी विजय रघुनाथराव अजनीकर, सुरेश दिगंबर कांबळे, व्यंकट गोविंद कसबे या तिघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता २८ जण निवडणूक रिंगणात आहेत. एका मतदान यंत्रावर १५ नावे व एक नोटाचा पर्याय असतो. आता उमेदवारांची संख्या वाढल्याने दोन मतदान यंत्र लागणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या, प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. १२ हजार पोलीस पर्सोनल मशिन उलब्ध आहेत. त्यामुळे अडचण येणार नाही.
लोकसभेचे हे आहेत उमेदवार...लातूर लोकसभेसाठी आल्टे विश्वनाथ महादेव (बहुजन समाज पार्टी), काळगे शिवाजी बंडप्पा (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुधाकर तुकाराम श्रंगारे (भारतीय जनता पार्टी),नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (वंचित बहुजन आघाडी), प्रवीण माधव जोहारे (स्वराज्य सेना (महाराष्ट्र)),बालाजी तुकाराम गायकवाड (भारत पीपल्स सेना),भारत हरिबा ननवरे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रॅटिक), भिकाजी गंगाराम जाधव (क्रांतिकारी जय हिंद सेना), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (बहुजन भारत पार्टी),लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), विकास कोंडीबा शिंदे (महाराष्ट्र विकास आघाडी),शंकर हरी तडाखे (बळीराजा पार्टी), श्रीकांत बाबुराव होवाळ (बहुजन मुक्ती पार्टी), श्रीधर लिंबाजी कसबेकर (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), सूर्यवंशी अतिथी खंडेराव (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), अभंग गंगाराम सूर्यवंशी (अपक्ष), अमोल मालू हनमंते (अपक्ष), उमेश अंबादास कांबळे (अपक्ष), दत्तू सोपन नरसिंगे (अपक्ष), दीपक चंद्रभान केदार (अपक्ष), पपीता रावसाहेब रणदिवे (अपक्ष), पंकज गोपाळराव वाखरडकर (अपक्ष), पंचशील विक्रम कांबळे (अपक्ष), प्रदीप सौदागर चिंचोलीकर (अपक्ष), बनसोडे रघुनाथ वाघोजी (अपक्ष), बालाजी शेषराव बनसोडे (अपक्ष), मुकेश गोविंदराव घोडके (अपक्ष), सुधाकर तुकाराम सूर्यवंशीं (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन...जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक पूर्वपिठीकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे उपस्थित होते.