निलंगा : भविष्यात भूगर्भातील खनिज संपत्ती संपुष्टात येईल. त्यामुळे सुप्त अवस्थेत जमिनीत असलेली औष्णिक ऊर्जा बाहेर न काढता जमिनीवर बांबू लागवडीतून संबंध विश्वाला औष्णिक ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होणे आवश्यक आहे, असे माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे सांगितले.
माजी आ. पाशा पटेल म्हणाले, नेदरलॅण्ड, फिनलॅण्ड व भारत या राष्ट्रांनी एकत्रित येऊन आसाममधील नुमालिगड येथे जगातील बांबूपासून वार्षिक ६ कोटी लिटर इथेनाॅल बनविण्याचे सुरू केलेले रिफायनरीचे काम प्रगतीपथावर आहे. २०२२ मध्ये उत्पादन सुरू होईल. जगातील ४८ देशांत बांबूचे उत्पादन घेता येते. चीन बांबूच्या उत्पादनापासून वार्षिक ३ लाख २० हजार कोटींची उलाढाल करतो. मात्र एकरी १५ टनापेक्षा जास्त उत्पादन घेण्यास चीन असमर्थ आहे. भारतात हेच उत्पादन एकरी ५० टनांपर्यंत घेता येते. त्यामुळे भारत हा जगातील एकमेव देश आहे की, येथे मोठ्या प्रमाणात बांबूचे एकरी उत्पन्न घेता येते. भविष्यात सर्व जगाला इथेनॉल पुरवठा करणारा भारत हा एकमेव देश राहील.
देशात २०१७ मध्ये बांबूची कुऱ्हाडबंदी कायद्यातून मुक्तता करण्यात आली. बांबूपासून कागद, कपडा, फर्निचर, लोणचं, तांदूळ अशा असंख्य वस्तू बनविता येतात. औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला आता बांबू हा सक्षम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राने जर ऊर्जा निर्मितीसाठी बांबू वापराचे धोरण स्वीकारले तर राज्यात २५ लाख हेक्टरवरील बांबू लागवड ही दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे उत्पन्न देणारे प्रभावी पीक ठरणार आहे, असा दावाही अभ्यासकांनी केला आहे.
जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी २०१५ च्या पॅरिस करारमध्ये टप्प्या-टप्प्याने औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता सर्व देश विविध प्रयोग करीत आहेत. महाराष्ट्रातील विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दरवर्षी सुमारे १० कोटी टन कोळशाची गरज आहे. या कोळशाला बांबू हा सक्षम पर्याय ठरणार आहे. त्यासाठी राज्यात २५ लाख एकरावर बांबू लागवड होणे आवश्यक आहे, असेही माजी आ. पाशा पटेल म्हणाले.
बांबू लागवडीनंतर तीन वर्षेे आंतरपीक...
परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पात ११३० मेगावॅट वीजनिर्मिती होते. या परिसरात दोन लाख एकरावर बांबू लागवड केली तर बांबू कोळशाला प्रभावी पर्याय ठरणार आहे, असे सांगून माजी आ. पाशा पटेल म्हणाले, बांबू लागवडीनंतर सलग तीन वर्षे सावलीत येणारी आंतरपिके घेता येतात. हळद, अद्रक, बटाट्याचे एकरी चार लाखापर्यंत उत्पन्न घेता येते.
बांबू लागवडीमुळे जागतिक तापमान वाढ नियंत्रण ठेवणे शक्य आहे. बांबू आणि कोळशाचा उष्मांक दर सारखाच असून बांबू सर्वाधिक कार्बन डाय-ऑक्साईड शोषून घेणारे आहे. सर्वात झपाट्याने वाढणारे, कोणत्याही जागेत येणारे असून बांबूला कार्बन क्रेडिटही मिळणार आहे. शेतीच्या बाजूने लागवड केल्यास पिकांचे संरक्षण होऊन उत्पन्नही मिळते, असेही माजी आ. पाशा पटेल म्हणाले.