राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : म्हैस चाेरीतील एका आराेपी उदगीर रेल्वे स्थानकानजीक फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता, ताे गटारात लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याला गटारातून बाहेर काढले आणि वाहन धुण्याच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन धुतले. ही घटना उदगीरात घडली असून, या धुलाईची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.
पोलिसांनी सांगितले, १७ ते १८ नोव्हेंबर २०२४ राेजी माळेवाडी शिवारातून सविता धोंडिबा कडोळे यांची म्हैस चोरट्याने पळविल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपीचा शाेध सुरु असताना शनिवारी ग्रामीण पोलिसांना रेल्वे स्थानकावर म्हैस चाेरणारा आरोपी हा फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे प्रकटन शाखेचे कर्मचारी तातडीने रेल्वे स्थानकावर धडकले. त्याचा शोध सुरु केला. मात्र, चोरटा काही आढळून आला नाही.
पोलिसांना पाहून चाेरट्याने ठाेकली धूक...
पोलिस आल्याचे पाहून चोरट्याने रेल्वे स्थानकावरुन धूम ठोकली. दीड किलोमीटरच्या अंतरावर एका गटारीत ताे लपून बसला. दरम्यान, काही नागरिकांना एकजण गटारात लपल्याचे आढळून आले. याची त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जात गटारात लपलेल्या चोरट्याला बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या अंगावर चिखल, घाण मोठ्या प्रमाणात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नजीकच्या वाहन धुण्याच्या वॉशिंग सेंटरवर नेले. तेथे मशीनच्या साहाय्याने त्याला धुतले.
म्हशी चोरल्याची दिली चोरट्याने कबुली...
चोरट्याची चौकशी केली असता, अशोक काशिनाथ मुदाळे (३८, रा. शिरुर अनंतपाळ, ह.मु. तेलगाव, ता. भालकी, जि. बिदर) असे नाव असल्याचे त्याने सांगितले. उदगीरसह तोगरी परिसरातील म्हशींची चोरी केल्याची कबुली चाेरट्याने दिली. ही कारवाई उदगीर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस कर्मचारी नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार तबेटवाड, राम बनसोडे, संतोष शिंदे यांच्या पथकाने केली.