लातूर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी पाच जणांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत १० तोळ्यांचे सोन्याचे दागिणे, ३५ तोळ्यांच्या चांदीच्या दागिण्यांसह रोख ४७ हजार असा एकूण ३ लाख ६१ हजारांचे ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले, तोंडार येथील फिर्यादी शिवकुमार गुरुनाथ खिंडे यांच्या घरात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील रोख २२ हजार लंपास केले. तसेच त्यांचे भाऊ गंगाधर गुरुनाथ खिंडे यांच्या घराचे कुलूप तोडून आतील ३ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुल, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व १० तोळ्यांचे चांदीचे दागिणे पळविले. त्याचबरोबर परमेश्वर गंगाधर सूर्यवंशी यांच्या घरातून २ तोळ्यांचे सोन्याचे दागिणे, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, तसेच वाहेद मताब शेख यांच्या घरातून दीड तोळ्याच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, २५ ग्रॅमची चांदीची चैन, रोख २५ हजार रुपये पळविले.
याचवेळी धोंडिराम माधवराव बिरादार यांच्या घरातून २ तोळ्याचा सोन्याचा हार पळविला. चोरट्यांनी एकूण १० तोळ्यांचे सोन्याचे दागिणे (किंमत अंदाजे ३ लाख), ३५ तोळ्यांचे चांदीचे दागिणे (किंमत अंदाजे १४ हजार) व रोख ४७ हजार रुपये असा एकूण ३ लाख ६१ हजारांचा ऐवज पळविला. याप्रकरणी रविवारी दुपारी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे हे करीत आहेत.