लातूर : सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिव वाढत असून, पारा ४० अंशावर पाेहचला आहे. परिणामी, अंगाची लाहीलाही हाेत असून, माेठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे. यापासून सुटका म्हणून रात्रीच्या वेळी ग्रामीण भागासह शहरी भागात काही नागरिक छतावर झाेपत आहेत. याच संधीचा फायदा चाेरट्यांनी घेत घर फाेडून १५ ताेळे साेने आणि राेख १२ हजार असा एकूण ४ लाख ९९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना जळकाेट तालुक्यातील पाटाेदा (खु.) येथे रविवारी घडली. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सूर्यकांत विठ्ठल केंद्रे (वय ४२ रा. पाटाेदा खु. ता. जळकाेट) यांच्यासह त्यांचे कुटुंब २३ एप्रिलराेजी रात्री राहत्या घराला कुलूप लावून छतावर झाेपी गेले. दरम्यान, त्यांनी आपल्या उशीखाली घराची चावी ठेवली हाेती. ती चावी अज्ञात चाेरट्यांनी हळूच काढून घेत खाली घराच्या दाराचे कुलूप काढले. कपाटावर ठवेलेल्या चावीने कुलूप काढत कपाटामध्ये ठवेलेले साेन्याचे १४ ताेळे ७ ग्रॅम जवनाचे दागिने आणि राेख १२ हजार असा एकूण ४ लाख ९९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत जळाकाेट पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक परकाेटे करत आहेत.
उठल्यावर उशीखालील चावी हाती लागली नाही...फिर्यादी पहाटेच्या दरम्यान उठल्यानंतर उशीखाली हात घालून चावी घेण्याचा प्रयत्न केला. हाताला चावी लागली नाही, त्यावेळी त्यांना घामच फुटला. छतावरुन खाली घरात आल्यानंतर चाेरट्यांनी आपल्याच उशीखाली ठेवलेल्या चावीच्या माध्यमातून घराचे कुलूप काढून प्रवेश केला. कपाटावर ठेवलेल्या चावीने कपाट उघडत साेन्याचे दागिने आणि राेकड पळविली. चाेरट्यांनी अतिशय चालाखीने घर फाेडले असून, याबाबतची जळकाेट पाेलिसांना त्यांनी माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ भेट देत स्थळपंचनामा केला.
चाेरट्यांनी रेकी करुन फाेडले घर?फिर्यादी सूर्यकांत केंद्रे हे घराच्या छतावर झाेपत असल्याची माहिती घेत, त्या घराची रेकी करत हा गुन्हा केला असावा, असा अंदाज जळकाेट पाेलिसांना आहे. चाेरट्यांनी घरातील व्यक्तींच्या हालचालींवर पाळत ठेवून, दैनंदिन आणि रात्रीच्या वेळी घरात काेणी झाेपत आहे का? याचीही माहिती घेत माेठ्या चालाखीने हे घर फाेडले असावे, असेही पाेलिसांनी सांगितले.