लातूर : वाढत्या उन्हामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यातच पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दरम्यान, वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून वन विभागाने जिल्ह्यात १५६ पाणवठे तयार करून तिथे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबण्यास मदत होत आहे.
गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ९४ गावे आणि २५ वाड्यांसाठी १३२ अधिग्रहणे करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सात गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलस्रोत आटू लागले आहेत, तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून वन विभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात ५ हजार हेक्टर वनक्षेत्रजिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. त्यात मोठे जंगल आहे. या विस्तीर्ण जंगलात मोर, हरिण, लांडगा, ससे, रानडुक्कर, वानर, मुंगूस, साप, सायाळ, कोल्हा, रानकुत्रे, खवले मांजर, काळवीट, गरुड अशा पशू- पक्ष्यांचा अधिवास आहे. या पशू- पक्ष्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
टँकरने केला जातो पाणीपुरवठाशासनाच्या निधीतून १५६ पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. प्रत्येक पाणवठ्याचे दर चार दिवसाला प्रत्यक्षात निरीक्षण केले जाते. शिवाय, ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गायी- म्हशी, शेळ्या- मेंढ्या, अशा पशुधनासाठी वनक्षेत्राच्या बाहेर सिमेंटचे हौद तयार करण्यात आले आहेत. तिथेही नियमित पाणी टाकण्यात येते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.
पक्ष्यांच्या तलावावर घिरट्या...प्रत्येक पाणवठ्यामध्ये नियमित पाणी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच दर चार दिवसांनी पाणवठ्यांचे निरीक्षण केले जाते. नागरिकांनीही पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात येळण्या बांधाव्यात आणि त्यात नियमितपणे पाणी टाकावे. विशेष म्हणजे, बहुतांश पक्षी हे तलावातील पाणी पीत असतात. त्यामुळे तिथे सर्वाधिक घिरट्या घालत असतात.-सचिन रामपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी