लातूर : चाेरीच्या गुन्ह्यातील तिघा सराईत आराेपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दाेन दुचाकी, एक पाणबुडी माेटार आणि तीन माेबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे पथक लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी चाेरट्यांचा माग काढत हाेते. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पथकाला खबऱ्याने माहिती दिली. लातुरातील शास्त्रीनगरात कमी पैशात मोबाइल विक्री करण्याच्या प्रयत्न करत आहेत. या माहितीवरून पथकाने तिघांना एका दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दाेन दुचाकी, एक पाणबुडी माेटार आणि तीन माेबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पादचाऱ्यांना मारहाण करून पळविले माेबाइल...परमेश्वर निवृत्ती बोयणे (२०, रा.शास्त्रीनगर, लातूर), विशाल चंद्रकांत गुळवे (१९, रा.इकबाल चौक, लातूर) आणि बाबा आजम पठाण (१९, रा.शास्त्रीनगर, लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आराेपींनी नावे सांगितली. त्यांच्याकडे मोबाइलबाबत चाैकशी केली असता, रात्रीच्या वेळी पाचनंबर ते औसा रोड जाणाऱ्या मार्गावर पायी जाणाऱ्या व्यक्तींना मारहाण करून, जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाइल, एक पाणबुडी मोटार, एक दुचाकी, गुन्हा करताना वापरलेली एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
माेबाइल चाेरीमध्ये दाेन महिलांना अटक...आणखीन एका कारवाईत स्थागुशाच्या पथकाने मोबाइल चोरीत दोन महिलांना ताब्यात घेत, चोरी केलेला मोबाइल जप्त केला आहे. त्यांच्याविराेधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक फौजदार संजू भोसले, अंमलदार रामहरी भोसले, योगेश गायकवाड, सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, नितीन कठारे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.