कासार शिरसी (जि. लातूर) : शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून करणाऱ्या तिघांविरुद्ध कासार शिरसी पाेलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या तिघांनाही निलंगा न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता न्यायालयाने साेमवार, २० जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील सुरेश आण्णाप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेतीचा वाद सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये सुरेश बिराजदार आणि मुलगा गणेश व साहील हे तिघे जण काम करीत हाेते. दरम्यान, बसवराज आण्णाप्पा बिराजदार, सुनील आण्णाप्पा बिराजदार आणि लखन आण्णाप्पा बिराजदार (सर्व रा. उस्तुरी, ता. निलंगा) यांनी शेतात येऊन लाठी-काठी, दगडाने मारहाण सुरू केली. यामध्ये सुरेश बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहिल (वय २२) यांचा कासार शिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सुभाष रावण हाबरे (वय ६०, रा. बडूर, ता. निलंगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासार शिरसी पाेलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. तिघाही आराेपींना पाेलिसांनी गुरुवारी रात्रीच अटक केली आहे. निलंगा न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने साेमवार, २० जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक पी.एम. राठाेड यांनी दिली.