लातूर : पिस्टल, एक जिवंत काडतूस, माेटारसायकल, तीन माेबाइल आणि राेकडसह दाेघांना लातुरातील कन्हेरी चाैकात पाेलिस पथकाने पहाटेच्या सुमारास अटक केली. एक फरार झाला आहे. त्यांच्याकडून जवळपास ५ लाख ५३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील चाैथ्या आराेपीला शनिवारी केजमधून उचलले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील कन्हेरी चाैक परिसरात तीन जण माेटारसायकलवरून संशयास्पद फिरत आहेत. त्यांच्याकडे पिस्टल, जिवंत काडतुसे असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस अधिकाऱ्याला दिली. या माहितीच्या आधारे विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी पाळत ठेवत माेठ्या शिताफीने, सापळा रचून तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यातील आकाश अण्णासाहेब व्हाेदाडे (वय २५, रा. कवठा ता. औस, ह.मु. प्रकाश नगर, लातूर), महादेव रावसाहेब फड (वय २५ रा. बामाजीचीवाडी ता. उदगीर ह.मु. माताजी नगर, लातूर) याला पाठलाग करून पाेलिसांनी पकडले. तर खंडू पांढरे (रा. माताजी नगर, लातूर) हा पाेलिसांची चाहूल लागताच पळून गेला. अटकेतील दाेघांकडून माेटारसायकल, पिस्टल, एक जिवंत काडतूस, तीन माेबाइल, राेख रक्कम असा एकूण ५ लाख ५३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील दाेघांना लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातून एकाला अटक...अटकेतील दाेघांची कसून चाैकशी केली असता पिस्टल काेठून आणले, याचा उलगडा झाला. बीड जिल्ह्यातील तेलगाव (ता. माजलगाव) येथील रमेश श्रीमंत मुंडे (वय ३०, रा. केज, जि. बीड) याला पाेलिस पथकाने शनिवारी तातडीने ताब्यात घेतले.