लातूर : घरफाेडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून, त्यांच्याकडून साेन्या-चांदीच्या दागिन्यासह २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, ताब्यात असलेल्या तिघांकडून तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले,लातूर जिल्ह्यातील चाेरी,घरफाेडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस पथक चाेरट्यांच्या मागावर हाेते. रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शाेध घेत असताना,खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे विजय बब्रू भोसले,(वय २४, रा. घाटशीळ रोड, तुळजापूर जि. उस्मानाबाद),शिवमणी संतोष भोसले (२० रा. जनवडा जि. बिदर), अजय व्यंकट शिंदे (१९ रा. सुगाव ता. चाकूर) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मुसक्या पथकाने आवळल्या. त्यांना ताब्यात घेत अधिक चाैकशी केली असता, शिवाजीनगर पाेलीस ठाणे येथील दाेन गुन्हे आणि एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून साेन्या-चांदीच्या दागिन्यासह २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. उर्वरित फरार आरोपींचा शाेध पाेलीस घेत असून, अधिक तपास शिवाजीनगर,एमआयडीसी ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे,अपर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,सपोनि. राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, पोउपनि शैलेश जाधव, अंगद कोतवाड, राजू मस्के, राम गवारे,सुधीर कोळसुरे,नितीन कटारे, सिद्धेश्वर जाधव, प्रदीप चोपणे, प्रमोद तरडे, नुकुल पाटील यांनी केली.