लातूर, दि. 14 - चाकूर तालुक्यातील आष्टामोड ते आष्टा या मार्गावर १० सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हसन जमीर शेख (२०), अमजद गफूर पटेल (२१), आणि शिवाजी भागवत (२८) या तिघांनी फिर्यादी सुशिल रामराव खराटे या दुचाकीस्वाराला अडवून मारहाण केली. शिवाय, त्याच्याकडे रक्कम लुटून फरार झाले़ यातील तिघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लातुरातून बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तिघांही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चाकूर तालुक्यातील आष्टामोड ते आष्टा गाव या मार्गावर १० सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुशिल रामराव खराटे (२७ रा. लातूर) हे आपल्या दुचाकीवरुन घराकडे जात होते. दरम्यान,अंधारात तिघे दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडविली. यावेळी तिघांकडून जबर मारहाण करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम लुटून फरार झाले. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लातुरात अट्टल गुन्हेगार हसन जमीर शेख (२० रा. नळेगाव ता. चाकूर), हा म्हाडा कॉलनीत राहणा-या आपल्या मावस भावाकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर अन्य दोन साथीदार अमजद गफूर पटेल (२१ रा. रावणगाव ता. देवणी), आणि शिवाजी मसू भागवत (२८ रा. फुलबारी ता. माळशिरस जि. सोलापूर) यालाही पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. तिघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पथकात पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, बालाजी अट्टरगे, बळवंत गरड, राजेंद्र टेकाळे, बालाजी मस्के आदींचा समावेश होता.
वाटमारी करणा-या तिघांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 7:09 PM