औसा (जि. लातूर) - मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील लामजना येथील लाडखाँ परिवार अजमेरला देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, गावाकडे परतताना मध्य प्रदेशातील रतलाम शहराडवळ उभा असलेल्या ट्रकवर भरधाव जीप आदळली. हा भीषण अपघात शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
लामजना येथील लाडखाँ परिवार 19 ऑगस्ट रोजी रात्री अजमेरच्या दिशेने जीपने (एमएच 25 आर 0854) निघाले होते. दरम्यान, अजमेर येथील देवदर्शनानंतर सदर जीप गावाकडे निघाली होती. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी मध्य प्रदेशातील नसिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रतलाम शहरानजीकच्या टोलनाक्यावर थांबलेल्या ट्रकवर (एचआर 65 ए-9370) भरधाव जीप आदळली. या भीषण अपघातात सलिम अब्दुल लाडखाँ (52), अलिशा शफीक लाडखाँ (30), रहिम सालार मुल्ला (35, सर्व रा. लामजना) हे ठार झाले. तर शफीक सलिम लाडखाँ (35), जन्नतबी सलिम लाडखाँ (50), अल्फिया शफीक लाडखाँ (8), अर्शद शफीक लाडखाँ (5), अहिल शफीक लाडखाँ (वय दीड वर्ष) आणि चालक नूरमहमंद शेख (30, सर्व रा. लामजना) हे गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना रतलाम येथील शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईक सय्यद लाडखाँ यांनी दिली आहे.
लामजना गावावर शोककळा...
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या लामजना या गावातील भाविकांनी मध्य प्रदेशातील अजमेर येथे देवदर्शनासाठी जाण्याचे ठरविले. त्यानुसार दर्शन घेऊन परतताना काळाने घाला घातला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघाताची माहिती लामजना गावात समजली. त्यानंतर गावावर शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.