चाकूर : तीन पिढ्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाणंद रस्ता खुला करण्यासाठी तालुक्यातील लिंबाळवाडीतील स्थानिक राजकीय मंडळींनी पुढाकार घेतला. त्यास यश आले असून अखेर हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून शेतीकडे ये-जा करणे सोयीचे होणार आहे.
तालुक्यातील लिंबाळवाडी येथील एक पाणंद रस्ता तीन पिढ्यांपासून भावकीच्या वादात सापडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे ये- जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर शेताकडे जाण्यासाठी चिखलातून मार्ग काढावा लागत होता. पशुधनास शेतीकडे नेणे शक्य होत नव्हते.
ही समस्या दूर व्हावी म्हणून लिंबाळवाडीचे सरपंच शरद बिराजदार, माजी पंचायत समिती सदस्य नारायण मुंजाने, चंद्रशेखर दांडगे यांनी पुढाकार घेतला. शेतकरी हणमंत पाटील व नागनाथ पाटील यांच्या सहमतीने आणि इतर शेतकऱ्यांच्या सहकार्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर लोकसहभागातून मातीकामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन सरपंच बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी सोसायटी सदस्य रामेश्वर बिराजदार, बापूराव गजिले, हणमंत पाटील, गुरुनाथ पाटील, किशन वाकळे, दीपक मंदे, अरुण चात्रे, धोंडिराम पलकोंडे, वैजनाथ चात्रे, नागनाथ पाटील, रंगराव पाटील, दत्ता गजिले, महादेव मरडे, पांडुरंग चात्रे, दत्ता वाकळे, बालाजी पलकोंडे, उमाकांत गोणे आदी शेतकरी उपस्थित होते. शेतरस्ते पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मंडळ अधिकारी माया येमले, तलाठी प्रशांत तेरकर यांनी सहकार्य केले.
रस्ते खुले करण्यासाठी मोहीम...जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या संकल्पनेतून शेतरस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन गावनकाशावरील शेतरस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून घ्यावेत. त्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल.- बालाजी चितळे, तहसीलदार.