लातूर : एकाच रात्री घरमालकासह भाडेकरू आणि शेजारचे घर फाेडून अज्ञात चाेरट्यांनी साेने-चांदीच्या दागिन्यांसह राेख रक्कम असा एकूण ३ लाख २० हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना निलंगा शहरातील शिक्षक काॅलनी, दापकानगर येथे २२ ऑगस्टच्या रात्री घडली. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी ज्ञानेश्वर विष्णुदास कुट्टेवाड (वय ४२, रा. शिक्षक काॅलनी, निलंगा) यांचे दपका परिसरातील दुर्गा नगरात घर आहे. ते आपले घर बंद करून गावाकडे गेले हाेते. दरम्यान, चाेरट्यांनी कुट्टेवाड यांचे घर, भाडेकरू आणि शेजारी राहणाऱ्या व्यक्ती अशा तीन घरांचा कडी-काेंडा ताेडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले ८२ ग्रॅम साेन्याचे दागिने, ४० ताेळे चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २० हजार ४१० रुपयांचा ऐवज अज्ञात चाेरट्यांनी लंपास केला. ही घटना २२ डिसेंबर राेजीच्या रात्री घडली. रविवारी घर फाेडल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने याबाबत निलंगा पाेलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने या तीनही घरांना भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला आहे.
याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून २५ डिसेंबर राेजी अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक शेजाळ करत आहेत.