लातूर : जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकींची चाेरी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील तिघांच्या माेठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या असून, बारा दुचाकींसह ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. लातूरसह जिल्ह्यातील दुचाकी चाेरीप्रकरणी टाेळीतील चाेरट्यांचा शाेध घेतला जात असताना, लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना बखऱ्याने माहिती दिली. विवेकानंद चौक ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत हा आरोपी बाभळगाव चौक परिसरात फिरत आहे. या माहितीची खातरजमा करुन घेतल्यानंतर पाेलिस पथकाने बाभळगाव परिसरात रोडवर थांबलेल्या व्यक्तींना झडप टाकून ताब्यात घेतले.
अधिक चाैकशी केली असता, त्यांनी नागेश हनुमंत मोरे (वय २६), जीवन गणपती सोनटक्के (वय २७) श्रीवर्धन आनंद सोनकांबळे (वय २०, तिघेही रा. पानशेवाडी, ता. कंधार जि. नांदेड) अशी नावे सांगितली. त्यांच्याकडे गन्ह्यांबाबत कसून चाैकशी केली असता, काही दिवसापूर्वी लातुरातील विश्वसागर सिटी, कातपूररोड येथून दाेन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने एकूण बारा दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, अशोक घारगे, पोउपनि. अनिल कांबळे, गणेशकुमार यादव, संजय बेरळीकर, गणेश यादव, सारंग लाव्हरे, विनोद चालवाड, रमेश नामदास, आनंद हल्लाळे, संतोष कलबोणे, अनिता सातपूते, अजहर शेख, शिवकुमार पाटील, ईश्वर जाधव यांच्या पथकाने केली.
लातूरसह नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ...
लातूर पाेलिसांच्या अटकेत असलेल्या दुचाकी चाेरणाऱ्या टाेळीतील तिघांनी लातूरसह नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ घातल्याचे समाेर आले आहे. त्यांनी लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यातून दुचाकींची चाेरी केल्याचे समाेर आले आहे. याबाबत त्या-त्या जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.