लातूर : शहरातील नवीन रेणापूर नका परिसरात असलेल्या तीन दुकानांना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आग माेठी असल्याने ती आटाेक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
लातूर शहरातील अंबाजाेगाई राेडवर रेणापूर नाका परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीसमाेर महामार्गालगत चारचाकी वाहनाचे गॅरेज, बॅटरी दुकान आणि छाेटेशे हाॅटेल आहे. या तिनही दुकानांना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारा अचानक आग लागली. काही वेळातच आगीने राैद्र रुप धारण केले. घटनास्थळी जमलेल्या आणि शेजारच्या दुकानदारांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. या घटनेची माहिती एमआयडीसी परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला मिळाली.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवळपास ४५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही आग आटाेक्यात आणण्यात त्यांना यश आले. मात्र, या तिन्ही दुकानातील सर्वच साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हाेते. या घटनेत तिन्ही दुकानाचे लाखाे रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी माेठ्या प्रमाणावर जमल्याने काही वेळासाठी वाहतूक काेंडीही झाली हाेती.