चाकूर (जि. लातूर) : शहरातील बोथीरोडवरील तीन दुकानांना शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ५२ लाखांचे साहित्य जळून भस्मसात झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. चाकुरातील बोथी रोडवर मन्मथ शंकर डुमणे यांचे न्यू सुरेखा मशिनरी ॲण्ड हार्डवेअरचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील ३० लाखांचे साहित्य जळाले. तसेच बबन सोमवंशी यांच्या सोमवंशी हार्डवेअरमधील १२ लाखांचे साहित्य भस्मसात झाले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या गाडेकर ट्रेडर्सला आग लागून १० लाखांचे नुकसान झाले आहे. या तिन्ही दुकानदारांचे सुमारे ५२ लाखांचे नुकसान झाले आहे.
कोविडच्या संकटामुळे व्यवसाय डबघाईला आला असता आता अचानकपणे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकानदारांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या येऊन ही आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील ज्वारी, पेंड, तांदूळ, वायर, मशिनरी, मोटरी दुरुस्तीचे साहित्य, शेती उपयोगी साहित्य जळाले आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, तलाठी नवनाथ खंदाडे यांनी भेट देऊन पंचनामा केला.