मुरुड : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या तीन दुकानांना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले असून, विकास साखर कारखानाच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.
शॉर्टसर्किटमुळे मुरुड येथील किराणा दुकान, चायनीज सेंटर व चिकन सेंटर या तीन दुकानांना आग लागली. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळके किराणा स्टोअर्स मधील दहा ते पंधरा लाखाचे किराणा सामान जळून खाक झाले. तसेच ब्रह्मा चायनीज सेंटरमधील दोन सिलेंडर पैकी एका सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये हॉटेलमधील फर्निचर, टेबल जळाले असून, चिकन सेंटरचे ही नुकसान झाले आहे.
आग लागलेल्या दुकानाच्या आजूबाजूला अनेक दुकाने आहेत. त्या दुकानाला ही आग लागण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटाेक्यात आणली. यावेळी माजी सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच हनुमंत नागटीळक, दत्ता नाडे, डॉ. हनुमान चांडक, डॉ. राजेंद्र बाहेती, नागनाथ बचाटे व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.