किनगाव/ अहमदपूर (जि. लातूर) - शेतात शेळ्या चारताना मन्याड नदीपात्राजवळ दिसलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून सख्खे बहीण- भाऊ आणि एक चुलत भाऊ पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र अचानक तोल गेल्याने हे तिघेही भावंडे नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथे शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
प्रतिक उर्फ बबलू ज्ञानोबा जायभाये (९), रोहिणी ज्ञानोबा जायभाये (१४), गणेश तुकाराम जायभाये (१२, रा. सुनेगाव शेंद्री, ता. अहमदपूर) असे मयत तिघा भावंडांची नावे आहेत. सुनेगाव शेंद्री येथील शेतकरी ज्ञानोबा जायभाये व तुकाराम जायभाये हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह असून त्यांचे शेत मन्याड नदीपात्राच्या काठानजीक आहे. नेहमीप्रमाणे हे दोघे भाऊ आणि प्रतिक उर्फ बबलू, रोहिणी, गणेश ही तीन मुले शनिवारी सकाळी शेताकडे गेली होती. ज्ञानोबा आणि तुकाराम हे दोघे शेतातील काम करीत होते. दुपारच्या वेळी ही तिन्ही मुले शेळ्या चारत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले. त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही.
सदरील लाकडाचे ओंडके पाण्यात ढकलून ही तिन्ही भावंडे त्यावर बसून पाण्याचा आनंद घेत होते. तेव्हा अचानकपणे तोल गेल्याने प्रतिक उर्फ बबलू, रोहिणी, गणेश हे तिघेही पाण्यात पडले. तिघांनाही पोहोता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आपली मुले दिसत नसल्याचे पाहून वडिलांनी नदीपात्राकडे येऊन पाहणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा लाकडाचे ओंडके पाण्यात दिसत होते. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परिसरातील शेतक-यांसह गावक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रकाश चिलकावार, नागनाथ पवार, नथ्थूलाल परदेशी यांनी पाण्यात उडी मारुन शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिघा भावंडांचे मृतदेह आढळून आले. सदरील मृतदेहांची उत्तरीय तपासणी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
घटनास्थळास उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, किनगाव ठाण्याचे सपोनि. शैलेश बंकवाड, पोउपनि. गजानन अन्सापुरे, पोहेकॉ. मुरलीधर मुरकुटे, व्यंकट महाके, चंदू गोखरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सख्ख्या भावांच्या दोन्ही मुलांवर काळाचा घाला...
ज्ञानोबा जायभाये यांच्या कुटुंबात आई-वडील, स्वत: पती- पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तर तुकाराम जायभाये यांच्या कुटुंबात स्वत: पती- पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शनिवारीच्या दुर्देवी घटनेत ज्ञानोबा यांचा एक मुलगा आणि एक मुलगी तर तुकाराम यांचा एक मुलगा मयत झाला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतिक होता तिसरीच्या वर्गात...
मयत प्रतिक हा गावातील जिल्हा परिषद शाळेतील तिसरी वर्गात होता. तसेच रोहिणी ही येस्तार येथील साने गुरुजी विद्यालयात आठवीच्या वर्गात होती तर गणेश हा गंगाहिप्परगा येथील बळीराजा विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तिन्ही विद्यार्थी हुशार होते, असे शिक्षकांनी सांगितले. मयत तिन्ही भावंडांवर शनिवारी रात्री एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश सुरु होता. त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावत होते.