लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांत मोठया प्रमाणावर वाढ झाली असून, विशेष पथकाने एमआयडीसी ठाण्यातील तीन गुन्ह्याचा छडा लावला आहे. दरम्यान, तीन दुचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुचाकी चोरीच्या तपासासाठी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गुन्ह्याचा तपास करताना बुधवारी खबऱ्याने माहिती दिली. एमआयडीसी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील चांडेश्वर व गंगापूर येथे राहणारे दोघे जण मोटारसायकल चोरीतील संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित समीर अहमद अली सय्यद, (वय २० ₹, रा. चांडेश्वर, ता. लातूर) आणि अनिकेत बाबुराव सातपुते, (वय १९, रा. गंगापूर ता. लातूर) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता, त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीतील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून कमी किमतीत मोटरसायकल विकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, अमलदार बेल्लाळे, संजू फुलारी, अर्जुन राजपूत, मदार बोपले, जाधव, पांढरे यांच्या पथकाने केली.