लातूर : आवास याेजनेतील यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव समाविष्ट करण्याच्या कामासाठी दाेन हजाराची लाच घेणारा नळेगाव (ता. चाकूर) येथील दाेषी ठरलेला ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय रामकिशन अडसूळ (वय ४४) याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी तीन वर्षाचा सश्रम कारावास व दाेन हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय अडसूळ याने इंदिरा गांधी आवास याेजनेच्या यादीत ना समाविष्ट करण्याच्या कामासाठी लाभार्थ्याकडून दाेन हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती. दरम्यान, याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाभार्थ्याने तक्रार दाखल केली. दरम्यान, लातुरातील सराफ लाईन परिसरात एसीबीच्या पथकाने २४ एप्रिल २०१२ राेजी दुपारी सापळा लावला. लाभार्थ्याकडून दाेन हजाराची लाच स्विकारताना पथकाने रंगेहात पकडले. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात कलम ७, १३(१)(डी) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाला. दाेषी ठरलेला ग्रामविकास अधिकारी सध्याला सेवानिवृत्त झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पाेलिस निरीक्षक सुरेश चाटे यांनी केला. काेर्ट पैरवी पाेलिस निरीक्षक अन्वर मुजावर, पाेलिस हवालदार भागवत कठारे यांनी केली. सरकार पक्षाच्या वतीने लातुरातील सहायक सरकारी अभियोक्ता शिवनारायण रांदड यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
लाच घेतल्याप्रकरणी दाेषी ठरलेला ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय अडसूळ याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी तीन वर्ष सश्रम कारावास आणि दाेन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.