ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 - एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पापविनाश रोडवरील ही घटना आहेत. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे.
कापड व्यपारी नरेश रतनलाल जाजू (५०) यांचे दयाराम रोड येथे डिलक्स नावाचे गारमेंटचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद घराकडे नोकरासह दुचाकीवरुन निघाले. दरम्यान, १०.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्याकडेला आपली दुचाकी पार्क करत असताना, पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात लुटारुंनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्या हातातील ६ लाख रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी नोकरासोबत या दोघांची झटापट झाली असता, त्याच्यावर चाकू हल्ला करत त्यांनी ही बॅग हिसकावत दुचाकीवरुन पळ काढला. काही कळायच्या आतच हे दोन लुटारू दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकणी व्यापारी नरेश जाजू यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळत ठेवून लुटले...?
व्यापारी नरेश जाजू यांच्यावर पाळत ठेवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज गांधी चौक पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिवसभर दुकानात बसून राहणा-या जाजू यांच्यावर दररोज किती वाजता हे घराकडे जातात, कुठल्या मार्गाने जातात आणि कुठल्या दुचाकीवरुन जातात याची माहिती घेऊन, त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवूनच त्यांना लुटल्याचा अंदाज आहे. लुटारू हे नेहमीचेच सराईत असावेत असाही अंदाज पोलिसांचा आहे.
लुटालुटीच्या घटनांत वाढ
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांकडून दिवसाढवळ्या महिला आणि वयोवृद्घ नागरिकांना लुटण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पोलीस केवळ तक्रार दाखल करण्यापलीकडे काहीच करत नसल्याने, लुटारुंचे मनोधर्य वाढत आहे. चापोलीनजीक चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरच्या महिलांना चालत्या आटोतून लुटल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळया लुटण्याच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात दशहत आहे. याकडे पोलिस यंत्रणा मात्र, फारसे गांभीर्याने पहायला तयार नाही. हे विशेष..!