राजकुमार जाेंधळे / चाकूर (जि. लातूर) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथून काेल्हापूरकडे दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकसमाेर आष्टामाेड येथे जीप आडवी लावून ट्रकमध्ये घुसलेल्या दराेडेखाेरांनी ७८ लाखांच्या दारुसह ट्रक पळिवला. रविवारी पहाटे ही घटना घडली. आष्टामाेड ते बाेरगाव काळे गावापर्यंत चालकासह अन्य तिघांच्या डाेळ्यावर चादर टाकली. तेथे त्यांना खाली उतरवून दाेरखंडाने बांधून दराेडेखाेर पसार झाले.
पाेलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून शनिवारी रात्री (एम.एच. २६ ए.डी. ३५८६) या क्रमांकाचा ट्रक ९९० दारुचे बाॅक्स घेवून काेल्हापूरकडे निघाला हाेता. दराेडेखाेरांनी ट्रकवर पाळत ठेवून चाकूर तालुक्यातील आष्टामाेडनजीक ट्रक अडविला. लातूरच्या दिशेने निघालेला या ट्रकमध्ये दराेडेखाेर घुसले. प्रारंभी त्यांनी चालकाला दमदाटी केली, चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर ट्रकवर ताबा मिळविला. ट्रकमधील चालकासह तिघांच्या अंगावर चादर टाकली. भरधाव वेगात ट्रक बार्शी राेडने बाेरगाव काळे गावापर्यंत आणला. गावानजीक ट्रक थांबविला. चालकासह इतर तिघांना खाली उतरण्यास सांगितले. राेडलगतच्या शेतात घेवून गेले. त्यांना कपडे काढायला लावले. दाेरखंड तसेच त्यांच्याजवळील कपड्यांनी हातपाय बांधले आणि ट्रक घेवून ते पसार झाले.
हात-पाय बांधालेल्या या चाैघांनी आली सुटका करुन घेतली. त्यानंतर राेडलगत असलेल्या एका हाॅटेलमध्ये येवून ट्रकमालकाला फाेनवर घडलेल्या घटनेची माहिती दिली. दरम्यान, महेश शिवाजी गायकवाड (रा. सांगवी ता. मुखेड) यांनी चाकूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. गातेगाव, मुरुड पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, सहायक पाेलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी तपासाच्या सूचना केल्या आहेत. पाेलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे पथक दराेडेखाेरांच्या मागावर आहे.
या मार्गावर वाहनधारकांना लुटण्याची ही तिसरी घटना...नांदेड-लातूर महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटण्याची ही तिसरी घटना आहे. आता तर दारुची वाहतूक करणारा ट्रक अडवून दराेडेखाेरांनी ७८ लाखांचा मुद्देमाल पळविला आहे. धर्माबाद येथील कारखान्यात तयार झालेली दारु काेल्हापूरला जात हाेती. त्यावर पाळत ठेवून दराेडेखाेरांनी लाखाेंचा मुद्देमाल लंपास केला आहे.