लातूर : गणेशोत्सव काळातील बंदोबस्त आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील कायदा व सुव्यवस्था आता नवीन तीन पोलीस उपअधीक्षक सांभाळणार आहेत. यासाठी बंदोबस्त आणि सुपर्व्हिजनसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदपूर उपविभागाचे कार्यक्षेत्र मोठे असून, उपविभाग आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता सांभाळण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांची नियुक्ती केली आहे. अहमदपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले हे सेवानिवृत्त झाल्याने येथील जागा रिक्त झाली होती. त्यासाठी चाकूर उपविभागाचा पदभार सध्या सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे आहे. तर अहमदपूर येथील पदभार तात्पपुरत्या स्वरूपात खिरडकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरुवारी काढले आहेत.
त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथून दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील आणि मनीषा कदम यांची लातूर जिल्ह्यातील गणेशोत्सव बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आता या नव्या दमाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.