हाळी हंडरगुळी येथे जनावरांचा बाजार भरतो. हा बाजार शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस असतो. दर आठवड्याला लाखोंची उलाढाल बाजारातून होत असते, तसेच दर रविवारी भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांचा दैनंदिन संपर्क हाळी हंडरगुळी गावाशी आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना बाजारचा आधार आहे. जनावरांच्या बाजारात पाणी विक्री, जनावरांचे साहित्य जसे दोरखंड, मोरकी, कासरे, मेका, चहाटपरी, चारा विक्री आदी सामान्य व्यवसाय चालवून अनेक कुटुंबे आपली उपजीविका करतात. तर काहीजण भाजीपाला विक्री, मिठाई विक्री, हातगाडे, हमालीद्वारे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात. बाजारामुळे ग्रामपंचायतीला करातून उत्पन्नही मिळते. मात्र, गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाच्या संसर्गामुळे हाळी हंडरगुळी येथील आठवडी बाजाराचे अर्थकारण ठप्प झाले आहे.
बाजार बंद असल्याने बाजारात मोलमजुरी करून उपजीविका करणाऱे, बाजाराशी संबंधित छोट्या व्यावसायिकांना संसाराचा गाडा चालविणे मुश्कील झाले आहे, तसेच हे बाजाराचे गाव असल्याने येथे बॅण्डबाजा, टेन्ट व्यवसाय, आचारी, बांगड्यांचा व्यवसाय, फोटोग्राफी असे लग्नसराईशी संबंधित व्यवसायही आहेत, पण ऐन लग्नसराईतच कोरोना वाढू लागल्याने असे व्यवसायही थांबून आहेत.
घरी राहावे तर पोट भरणे अवघड व कामाच्या शोधात बाहेर जावे, तर संचारबंदीमुळे काम मिळत नाही, अशी अवस्था सामान्यांची झाली आहे.
हाताला काम मिळेना...
हाळी हंडरगुळी येथील बाजारमुळे हाताला काम मिळत होते, परंतु कोरोनाच्या संकटामुळे हाताला कामही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संसारचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे हंडरगुळी येथील तानाजी पौळ यांनी सांगितले.