यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू, ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी वेळ अमावास्येमुळे शेतशिवारात बच्चे कंपनीने ट्रॅक्टर, बैलगाडीमध्ये बसून शिवार फेरीचा आनंद लुटला तसेच अनेक ठिकाणी पतंग उडविणे, विटू-दांडू खेळणे, किक्रेट आदी खेळांचा आनंद बच्चे कंपनीने घेतला.
पहाटेपासूनच गावा-गावांत लगबग...
दर्श वेळा अमावास्येनिमित्त जिल्हाभरात सकाळपासूनच गावागावात मोठी लगबग सुरू होती. पहाटेपासून डोक्यावर खाद्य पदार्थांचे ओझे घेऊन महिलांसह शेतकरी शेतशिवाराकडे निघाले होते. त्यामुळे गाव आणि शहरात मात्र शुकशुकाट जाणवत होता. बैलगाडी, दुचाकी, चारचाकी आणि ऑटोतून शेतकरी कुटुंब आपल्या शेताकडे जात होते. सायंकाळी पुन्हा गावाकडे परतीचा प्रवास झाला. दरम्यान, बच्चेकंपनीसह आबालवृद्धांनी शेतशिवारात फेरफटका मारत आनंंद लुटला.
लातूर शहरात शुकशुकाट...
मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या वेळा अमावास्यानिमित्त लातूर शहरातील नागरिकांची शेताकडे जाण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू होती. सकाळी शहरातील रस्ते गावाकडे जाणाऱ्या माणसांनी फुलून गेली होती. टप्प्या-टप्याने शहरातील रस्त्यांवर वाहतूक आणि नागरिकांची गर्दी कमी झाल्याने जणू अघोषित संचारबंदी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. वेळा अमावस्यानिमित्त सकाळच्या वेळी शहरातील रस्त्यांवर गर्दी असली तरी दुपारी १२ ते ४ या कालावधीत सर्वत्र शुकशुकाट होता. बाजारपेठाही बंद होत्या. सायंकाळी शेतशिवारातून आल्यानंतर काहीजणांनी आपल्या दुकान सुरू केल्याचे चित्र होते.
शहरातील उद्याने बहरली...
ज्यांना शेत नाही, ज्यांचे गाव शहरापासून लांब आहे. अशा शहरातील नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्कसह इतर उद्यानांमध्ये वेळा अमावस्या साजरी केली. वेळा अमावास्येनिमित्त खास तयार करण्यात आलेला मेन्यूसोबत नेऊन या आबालवृद्धांनी बागेतच वनभोजनाचा आस्वाद घेतला. परिणामी, सकाळपासूनच शहरातील उद्याने, नागरिक, आबालवृद्धांच्या गर्दीने बहरली होती. दिवसभर बालके खेळण्या-बागडण्यात रममाण झाल्याचे पहावयास मिळाले. अतिशय आनंदी वातावरणात शहरातील नागरीकांनी दर्श वेळा अमावास्या उद्यानात साजरी केली.