लातूर : अंबाजाेगाईकडून येणारा भरधाव टिप्पर रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला वाचविण्याच्या नादात दुभाजकावर चढला. यामध्ये ताे तरुण जखमी झाला असून, गावकऱ्यांनी टिप्परचालकाला पकडून रेणापूर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा अपघात शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घाला. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नाेंद करण्यात आली नव्हती.
रेणापूर तालुक्यातील काेळगाव तांडा येथे लातूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडून अंबाजाेगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक ३० वर्षीय तरुण रस्ता ओलांडत हाेता. दरम्यान, अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेला भरधाव टिप्पर या तरुणाच्या अंगावर आला. यावेळी तरुणाला वाचविण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो टिप्पर दुभाजकावर चढला. यावेळी तांड्यावरील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत टिप्परचालकाला ताब्यात घेतले. जखमी तरुणाला तातडीने ग्रामस्थांनीच रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात अपघाताची नोंद रात्री उशिरा करण्यात आली नव्हती.
शुक्रवारी रात्रीही ११ वाजता घडला अपघात...अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेली कार रस्त्यावरून वळणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात कारचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रॅक्टरचालक हा काेळगाव तांडा येथील महामार्गावरून अंबाजाेगाईच्या दिशेने वळवत हाेता. यावेळी अंबाजाेगाईकडून लातूरच्या दिशेने निघालेली भरधाव कार ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती मात्र समजू शकली नाही.