लातूर : बार्शी-लातूर राज्य मार्गावर भरधाव वेगातील टिप्परने आज दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास साखरा पाटीजवळ तीन दुचाकींना उडविले. या विचित्र अपघातात दुचाकींवरील चौघे ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लातूरहून मुरुडच्या दिशेने भरधाव निघालेल्या टिप्परने (एमएच १६ क्यू ६८७७) समोरून लातूरकडे येणाऱ्या तीन दुचाकींना उडविले. या भीषण अपघातात तीन दुचाकींवरील तिघे जागीच ठार झाले. अन्य एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकावर शासकीय रुग्णालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये प्रजित पांडुरंग माळी (२६, रा. एकुरगा, ता. लातूर), नागनाथ मलबा यलगटे (५०, रा. चाटा, ता. लातूर), बुद्धघोष नामदेव पालके (३८), शंकर बाबु काळे (२८, दोघेही रा. येडशी, जि. उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एकुरगा येथील पोलीस पाटील मिटाप्पा गोपाळ गुट्टे (५५), जालिंदर गुट्टे (६०) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच गातेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. भरधाव टिप्पर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला, अशी माहिती पोलीस कर्मचारी सुग्रीव कोंडामंगले यांनी दिली.