लातूर : लातूर शहर महानगरपालिका मागील वर्षभरापासून दिव्यांगांचा पाच टक्के विकास निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने निधी वाटप तत्काळ करावा, या मागणीसाठी बुधवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर तिरडी आंदोलन करण्यात आले. आक्रमक झालेल्या आंदोलकांना जवळपास एक तासानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर माघार घेण्यात आली.
अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शासन निर्णयानुसार दरवर्षी दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के निधी आर्थिक स्वरूपात देण्याची तरतूद असताना मनपा प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आर्थिक वर्ष मार्च महिन्याला पूर्ण होते, तरी अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या निधीकडे मनपा गांभीर्याने पाहत नसल्याने बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शेकडो दिव्यांगांनी तिरडीसह प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मनपा आयुक्त समोर येणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही, असा निर्णय आंदोलकांनी घेतला. काही वेळात महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी रुक्मानंद वडगावे आंदोलनस्थळी आले. त्यांनी मनपा उपायुक्तांनी लेखी दिलेले आश्वासन वाचून दाखवत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी निसार शेख, शारदा बेद्रे, वैशाली शिंदे, अन्सार हरणमारे, मतीन शेख, योगिराज संकाये यांच्यासह शेकडो दिव्यांग उपस्थित होते.
मार्च एण्डपर्यंत सर्वांनाच लाभ मिळणारलातूर शहर महापालिका दिव्यांग कल्याण या लेखाशीर्षाखाली दरवर्षी ५ टक्के निधी राखीव ठेवते. मनपाला महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या निधीत ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्चाची तरतूद आहे. त्यानुसार यंदा जवळपास ७० लाखांची तरतूद आहे. यात ६७ जणांना चलनवलन साहित्यासाठी १० लाखांचा निधी वाटप केला आहे. जे लाभार्थी यादीत राहिले आहेत, त्यांना दोन टप्प्यात १८ मार्चपर्यंत २००, ३१ मार्चपूर्वी १९९ जणांना लाभ दिला जाईल, असे लेखी आश्वासन मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीने आंदोलकांना देण्यात आले. मनपाचे महिला व बालविकास अधिकारी रुक्मानंद वडगावे यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी पत्र दिले.