लातूर : शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपा उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. त्यांना माझे आशीर्वाद आहेत. परंतु, याचा अर्थ मी त्यांच्या पक्षाचा नाही. शिवाय, मी कोणाच्याही प्रचारात नाही, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी बुधवारी येथे दिली.
माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर म्हणाले, मी काँग्रेसचा नेता राहिलो. १९७२ ते २०१० पर्यंत सक्रिय होतो. दोनवेळा विधिमंडळात तर नऊवेळा संसदेत होतो. लातूरच्या राजकारणावर ते म्हणाले, इथे काय सुरू आहे, मला फारशी माहिती नाही. सरकारमध्ये राहिल्याने इकडे येणे कमी होते. सध्या जो कोणी मला भेटतो, तो वातावरण तुमच्या उमेदवाराचे चांगले म्हणत आहे. त्यावर तुमचा उमेदवार म्हणजे? असे विचारल्यावर चाकूरकर म्हणाले, आमचा म्हणजे कुटुंबातला उमेदवार. मात्र, ते ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाचा मी नाही. गेल्या ५०-५५ वर्षांपासून एकाच पक्षात राहिलो आहे. दुसरीकडे कुठे जाणे मला योग्य वाटले नाही. परंतु, कुटुंबातील उमेदवारासोबत मी आहे. माझ्या त्यांना सदिच्छा आहेत, याचा पुनरुच्चार केला.
काँग्रेसने भरपूर दिले, बोलणारे बोलतातएका सभेत माजी मंत्री काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आ. अमित देशमुख यांनी देवघरमधील ‘देव’ आमच्यासोबत आहे, असे विधान केले होते, त्या संदर्भात चाकूरकर म्हणाले, निवडणुका आहेत. बोलणारे बोलतात. मी कोणाचा आहे ते मी ठरवणार. काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार का, विचारल्यावर ते म्हणाले, मी कोणाच्याही प्रचारात नाही. काँग्रेसने न मागता भरपूर दिले. विधानसभा, लोकसभा सदस्य, केंद्रात मंत्रीपदे दिली. सभापती होतो. तिथे मला सर्व पक्षाच्या सदस्यांनी सहकार्य केले, असेही चाकूरकर म्हणाले.