औराद शहाजानी : जिल्ह्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर कोसळले असून २ ते ३ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे. बाजारपेठेतील घसरलेल्या दरामुळे शेतकरी शेतातील टोमॅटोही काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतात लाल चिखल निर्माण होत आहे.
जिल्ह्यात वडवळ नागनाथ, औराद शहाजानी, किल्लारी, औसा, हेर, जानवळ या भागात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. रब्बी हंगामातील वैशाली टोमॅटोला देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते. जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पन्न थेट सपाट जमिनीवर न घेता बेड तयार करून मल्चिंग पेपरवर घेतले जाते. त्यास दोरी व काठीच्या साह्याने बांधीव उत्पादन घेतल्याने दर्जेदार टोमॅटो उत्पादन तयार होते. त्यामुळे या टोमॅटोला मुंबई, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली,उत्तरप्रदेश, दक्षिण भारतासह परदेशातही मागणी मोठी असते.
यावर्षी पाऊस चांगला झाला. जलसाठे भरले. रब्बी हंगामात जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. तसेच इतर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आणि टोमॅटोचा हंगाम जानेवारीतच सुरू झाला. कारण सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तीन महिने सतत चालणारा ताेडणीचा हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला. परिणामी बाजारपेठेत ज्या शेतकऱ्यांची शंभर कॅरेट आवक होती, तिथे दोन हजार कॅरेटची आवक होऊ लागली. साधारणत: ही आवक तीन ते चार महिने विभागून होत असते. आवक एकाचवेळी होत असल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
एकरी सव्वालाखांचा खर्च...
जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कॅरेट टोमॅटोची आवक होत आहे. बाजारात मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने गत महिन्यात २५० ते ३०० रुपये प्रति कॅरेट मिळणारा दर आता ७० ते १०० रुपयांवर येऊन ठेपला आहे. या दरात टोमॅटोची तोडणी करणेही निघत नाही. टोमॅटोसाठी एकरी साधारणत: एक ते सव्वालाखांपर्यंत खर्च होतो. मात्र, कवडीमोल दराने टोमॅटो विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणीही बंद केली आहे.
आवक वाढल्याने दरात घसरण...
शेतकरी देवराव म्हेत्रे म्हणाले, सतत ढगाळ वातावरण, मध्यंतरी झालेला पाऊस, थंडीची तीव्रता कमी झाल्याने लागवड वाढली. तीन महिन्यात होणारी करावी लागणारी टोमॅटोची तोडणी एकाच महिन्यात करावी लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. तोडणीचाही खर्च निघत नसल्याने ती बंद केली आहे. प्लॉट सांभाळण्यासाठी फवारणी करावी लागेल. त्याचा खर्च आता परवडत नाही. बाजारात मागणी घटली आणि आवक वाढली आहे. बाजार सुधारण्यास काही कालावधी लागेल, असे व्यापारी वहाब पटेल म्हणाले.