उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील लोहारा येथील एका डाळमिलमधून सहा महिन्यांच्या कालावधीत १६ लाख ३९ हजार रुपयांची तूर दाळ चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डाळ मिलच्या व्यवस्थापकासह अन्य दोघांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील लोहारा परिसरातील सर्वे नंबर ४९२ मध्ये ज्ञानेश्वर किशोर पंदिलवार यांच्या मालकीची विनायका ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची डाळ मिल आहे. या डाळमिलमध्ये शिवकांत रमेश बिरादार (रा. संगनाळ, ता. औराद, जि. बीदर) हे मॅनेजर म्हणून काम करीत होते. दरम्यान, मॅनेजर व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी १५ ऑक्टोबर २०२२ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत मिलमधून ५० किलोचे एकूण २९८ कट्टे तूर दाळ पळविली. त्याची अंदाजे किंमत १६ लाख ३९ हजार रुपये आहे.
मिलमालक ज्ञानेश्वर पंदिलवार यांना मिलमधून डाळ चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वरील तिघांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन शुक्रवारी तिघा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भोळ हे करीत आहेत.