लातूर : जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. यात १० हजार २९२ उमेदवारांनी सरपंच व सदस्यपदी १० हजार ३४८ नामनिर्देशपत्रे दाखल केली. दरम्यान, सोमवारी या अर्जांची छाणनी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येत होते. मात्र, संकेतस्थळावर अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात आले. त्यामुळे शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तहसील कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी ऊसळली होती. अर्ज भरण्यासाठी २८ नोव्हेंबर ते डिसेंबरची मुदत दिली होती. अखेरच्या दिवसांपर्यंत सदस्यपदासाठी ८ हजार ५६५ उमेदवारांनी ८ हजार ६०० तर सरपंच पदासाठी १ हजार ७२७ उमेदवारांनी १७४८ अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, सोमवारी या अर्जांची छाणनी होणार असून, सात डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निलंग्यात सर्वाधिक ६८ ग्रामपंचायती...निलंगा तालुक्यात सर्वाधिक ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापाठोपाठ लातूर ४४, औसा ६०, अहमदपूर ४२, शिरुर अनंतपाळ ११, चाकूर ४६, जळकोट १३, उदगीर २६, देवणी ८ तर रेणापुर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती निवडणुका होत आहेत.