हरी मोकाशे, लातूर : आडत बाजार पूर्ववत करण्यासाठी बाजार समितीने नोटिसा बजावूनही खरेदीदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी, पेच सुटेनासा झाला आहे. खरेदीदार आणि आडत्यांच्या वादात शेतकरी, हमाल- मापाडी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सततच्या चर्चेच्या गुऱ्हाळामुळे बाजार समिती लवकर सुरु होण्याची चिन्हे कमी दिसू लागली आहेत.
सध्या हंगाम नसल्याने बाजार समितीत शेतीमालाची आवक कमी होत होती. दररोज जवळपास ७ ते ८ कोटींची उलाढाल होत होती. पणन कायद्यानुसार शेतीमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांत आडत्यांना पैसे द्यावेत, असे पत्र बाजार समितीने काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश देण्यात येईल, असे सांगितले. या पैश्याच्या कारणावरुन वाद सुरु आहे. त्यामुळे १ जुलैपासून बाजार समिती बंद आहे. सोमवारी १५ व्या दिवशीही आडत बाजार बंद राहिला.
नोटिसीला वाटाण्याच्या अक्षता...
आडत बाजार सुरु करावा म्हणून बाजार समितीने खरेदीदारांना नोटिसा बजावून २४ तासांची मुदत दिली होती. व्यापाऱ्यांनी नोटिसा स्वीकारल्या. परंतु, मुदत संपली तरीही सौद्यात उतरले नाहीत. त्यामुळे नोटिशील वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पहावयास मिळत आहे.
चार दिवसांची मुदत देऊ...
शेतकऱ्यांसाेबतचे नाते टिकविण्यासाठी आडत्यांना शेतीमालापोटी उचल द्यावी लागते. त्यामुळे शेतमाल खरेदीनंतर २४ तासांत पैसे देण्याचा कायदा आहे. व्यवहार सुरु राहण्यासाठी आम्ही खरेदीदारांना चार- पाच दिवसांची मुदत देऊ. मात्र, शेतमाल खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला धनादेश द्यावा. त्यामुळे आम्हालाही पैश्याची हमी मिळेल.- चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, आडत असोसिएशन.
हलगीनाद करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न...
१ जुलैपासून बाजार समितीत शेतमालाचा सौदा बंद आहे. त्यामुळे हमाल- मापाडींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. याकडे बाजार समितीचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपाेर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने हलदीनाद करण्यात आले. लवकरात लवकर व्यवहार सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न...
आडत बाजार सुरु होणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्यवाहीऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच तोडगा निघले आणि शेतकऱ्यांची अडचण दूर होईल.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.