लातूर : शहरातील अनेक चौकांमध्ये दररोज वाहतुकीची कोंडी सर्वज्ञात आहे; मात्र आता तहसील कार्यालयाच्या समोर नेहमीच वाहतूककोंडी होत आहे. अनेक वाहनधारक राँग साइडने वाहने घुसवत असल्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांची आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय; तसेच न्यायालय या भागात आहे. त्यामुळे शासकीय कामकाजानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा सुरू असते; परंतु उद्योग भवनाकडून; तसेच शिवाजी चौकाकडून आणि गांधी चौकाकडून येणारी वाहने तहसील कार्यालयाकडे वळविताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. बुधवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास राँग साइडने आलेल्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. तब्बल अर्धा तास अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागले. या शासकीय कार्यालयांबरोबरच अनेक दवाखानेही या रस्त्यावर आहेत. त्यामुळेही वर्दळ आहे.
वाहतूक पोलिस कर्मचारी नियंत्रणासाठी हवापंचायत समितीच्या कमानीच्या पुढे मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी होते. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची येथे नेमणूक होण्याची गरज आहे. पोलिस कर्मचारी नियुक्त केल्यानंतर राँग साइडने येणाऱ्या वाहनधारकांवर आळा बसणार आहे, असे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
दररोज दुपारच्या वेळी वाहतूककोंडी...सरकारी कार्यालये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होतात. त्यामुळे कर्मचारी सोडून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, वाहतूक समस्येमुळे त्यांना वेळेत पोहोचता येत नाही, ही अडचण दूर व्हावी, यासाठी मार्ग निघण्याची गरज आहे. मार्ग निघाला तर होणारा मनस्ताप दूर होईल, असेही व्यावसायिक म्हणाले.