आज जिल्हास्तरीय युवा महोत्सव
लातूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शनिवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमात स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना विभागस्तर फेरीसाठी सहभाग नोंदविता येणार आहे. कोरोनामुळे यंदा ऑनलाईन महोत्सव होत आहे.
तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी पुरवठा
लातूर : लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून हरभरा तसेच भाजीपाल्याची निवड केली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचन प्रणालीचा पर्याय शेतकऱ्यांनी अवलंबिला आहे. तसेच स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके जोमात आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांवर फवारणी केली जात आहे.
गृहविलगीकरणात १६८ रुग्णांवर उपचार
लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख २२ हजार ७८१ वर पोहोचला आहे. त्यापैकी २१ हजार ७८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये १६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर स्थानिक डाॅक्टर वाॅच ठेवत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना जनजागृती मोहिमेला गती
लातूर : तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती केली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच गावोगावी भित्तीपत्रके लावण्यात आली असल्याचे प्रवीण पाटील म्हणाले.
डाॅ. गणपतराव मोरे यांनी स्वीकारला पदभार
लातूर : लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी डाॅ. गणपतराव मोरे यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, वसंतराव पाटील, रामदास पवार, प्रा. बाबुराव जाधव, जब्बार सगरे, प्रभाकर बंडगर, बाळासाहेब चव्हाण आदींसह मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा प्रभारी पदभार भगवानराव सोनवणे यांच्याकडे होता. आता गणपतराव मोरे यांनी पदभार स्वीकारला आहे.
विद्यार्थी वाहतूक संघटनेचे निवेदन
लातूर : कोरोनामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. या संदर्भात लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना शिष्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाडे, सुरेंद्र सरवदे, विनोद किरकिले, अनिल शिंदे, गोविंद पाटील, एकनाथ पन्हाळे, प्रशांत भोसले, पद्माकर कलेकर, मोहन कसपटे, महेश स्वामी उपस्थित होते.
आरोग्य विभागाशी संपर्क साधावा
लातूर : इंग्लंडमधील काही भागांत कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नवीन विषाणू आढळून आलेला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडहून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
ओटीएस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
लातूर : आर्थिक अडचणीमुळे थकित कर्जदारांच्या मदतीसाठी भारतीय स्टेट बँकेतर्फे एकवेळ तडजोड योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय महाप्रबंधक नंदकिशोर भोसले यांनी केले आहे. या योजनेत एनपीए तारखेपासूनच्या प्रतिकात्मक व्याजामध्ये सूट, परतफेडीच्या रकमेत १५ ते ९० टक्के सूट तसेच विशिष्ट अटीवर पुनर्कर्जाची सोय दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कृषी विभागातर्फे मार्गदर्शन शिबीर
लातूर : जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या हरभरा, गहू पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.