लातूर : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापने शोध व बचाव पथकास पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून नागझरी बॅरेज येथे पूरपरिस्थिती हाताळण्यासाठीचे प्रगत प्रशिक्षण देण्यात आले. १० फेब्रुवारीपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, याठिकाणी आवश्यक साहित्य सामुग्री, तंबू, बोटीची प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शोध मोहीम संचालित करताना संभावित चुका टाळणे, काय खबरदारी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शोध व बचाव सदस्यांचे प्रश्न, शंकाचे निरसनही एन.डी.आर.एफ. च्या पथकांनी केले. जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिपूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.अग्निशमन, पोलीस पथकासही प्रशिक्षण...यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे येथील निरीक्षक प्रमोद राय, उपनिरीक्षक बिबिषण मोरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप माने, उदगीरचे अग्निशमन अधिकारी विशाल आलटे, विद्यापीठ उपकेंद्राचे प्रा. डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते. या प्रशिक्षणात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा येथील अग्निशमन विभागाचे पथक, त्याचबरोबर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीसांचे २० सदस्यीय पथकाने सहभाग नोंदवला.