लातूर : खेळातील बदललेले नवीन नियम यासह पूरक व्यायामाची माहिती, प्रशिक्षणाची पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षण शिबिर सुरू असून, यात जिल्ह्यातील ११५ क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने हे शिबिर सुरू असून, यात खेळाच्या नवीन बाबींसह क्रीडा पत्रकारिता, आहार, शालेय शिस्त, फिजिओथेरपी, मानसोपचार पद्धती, क्रीडा प्रबोधिनी व त्याचे महत्व विषद केले जाणार आहे. सकाळ - सायंकाळच्या सत्रात प्रॅक्टिकल, माहितीसह दुपारच्या वेळेस थिअरीचाही क्लास विविध खेळांच्यानुसार घेतला जात आहे. विविध खेळांचे नियम, प्रशिक्षण पद्धती यात क्रीडा शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविले जात आहे. ८ जुलैपासून हे शिबिर सुरू असून, १७ जुलैपर्यंत हे दहा दिवसीय शिबिर सुरू आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर आदी परिश्रम घेत आहेत.
जुन्या व नव्या खेळांचा समावेश...
जुन्या खेळांसह नवीन खेळांचा प्रशिक्षणात समावेश असून, यात थ्रोबॉल, ज्युदो, खो-खो, बुद्धिबळ, बास्केटबॉल, स्क्वॅश, फुटबॉल, टेबल टेनिस, बेसबॉल, टेनिकॉईट, हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सॉफ्टबॉल, सायकलिंग, योगा, वुशू, डॉजबॉल, क्रिकेट, मैदानी, नेटबॉल, कुस्ती, बॉलबॅडमिंटन, लॉनटेनिस, कराटे, कॅरम, व्हॉलिबॉल, रग्बी, जिम्नॅस्टिक, स्विमिंग, हँडबॉल, मॉडर्न पॅन्टॉथलॉन, वेटलिफ्टिंग, आट्यापाट्या, मल्लखांब, कबड्डी, सॉफ्ट टेनिस, सेपकटकरा, शूटिंग बॉल, रायफल शूटिंग आदी खेळांचा समावेश आहे.