राजकुमार जाेंधळे / लातूर : चाेरट्या मार्गाने एका वाहनातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी आवळल्या. त्यांच्याकडून गुटख्यासह वाहन असा एकूण १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील शाहू चौकातून गंजगाेलाईकडे एका वाहनातून गुटखा व सुगंधित तंबाखूची चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंजगाेलाई परिसरात सापळा लावला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला न्यू प्रेम किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानासमोरून ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. वाहनात महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला किंमत ४ लाख ५१ हजार २०० रुपये आणि इनोव्हा कंपनीचे वाहन असा एकूण १४ लाख ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात व्यंकटेश चंदन कोमटवाड (२४, रा. ज्ञानेश्वरनगर, लातूर), विशाल शिवाजीराव चव्हाण (३७, रा. मुरंबी, ता. चाकूर), तानाजी बालाजी खताळ (३२, रा. बादाडे नगर, लातूर) आणि वाहनमालक प्रेम तुकाराम मोरे (रा. साळी गल्ली, लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पाेलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, साहेबराव हाके, मनोज खोसे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली.