शहरातील दूभाजकाच्या स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील मुख्या मार्गावरील दूभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी दूभाजकात कच-याचे ढीग साचले असून, वा-यामुळे सदरील कचरा रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड आदी ठिकाणी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान याबाबत वेळोवेळी मनपाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे दूर्लक्ष आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा
लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अनेक गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केले आहेत. दरम्यान अद्याप बहूतांश प्रस्तावांना तहसील स्तरावरुन मान्यता मिळाली नसल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. संभाव्य टंचाई निवारणासाठी ११ काेटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येणार आहे. दरम्यान, अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
वाहतूक पोलीसांकडून वाहनांची तपासणी
लातूर : शहरातील संचारबंदीत काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. त्याअनुषांगाने अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यतची वेळ देण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेकजण ११ वाजेनंतर रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. परिणामी, पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण फिरणा-यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, विनाकारण बाहेर फिरु नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
समांतर रस्त्याच्या कडेला कचरा
लातूर : शहरातील रेल्वे लाईन संमातर रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची असून, नियमित कचरा संकलन केले जात नसल्याने अनेकजण रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहे. त्यामुळे भाजीपाला बाजार तसेच सकाळी रस्त्याने जाणा-या वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तालुकाध्यक्षपदी रफिक शेख यांची निवड
लातूर : संभाजी ब्रिगेड लातूर तालुकाध्यक्षपदी रफिक शेख यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि ग्रंथभेट देऊन शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उमाकांत उफाडे, ओम जाधव, अदित्य जवळगे, राजेसाहेब किर्दवंत यांची उपस्थिती होती. आगामी काळात गरजुंना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मदत करणार असून, कोरोनाच्या काळात गोरगरिबांना मदत व्हावी, यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे नुतन तालुकाध्यक्ष रफिक शेख यांनी सांगितले.