लातूर : ट्रकने कारला समोरून दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना लातूर ते नांदेड महामार्गावर शिरूर ताजबंद गावानजीक गुरुवारी रात्री घडली. यामध्ये कारचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला असून, तीन लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, शिवाजी मुरलीधर सूर्यवंशी (रा. मुळकी उमरगा ता. अहमदपूर ह.मु. अहमदपूर) हे कारने (एम.एच. १४ एफ.एम. ९२७८) गुरुवारी रात्री प्रवास करत होते. दरम्यान, शिरूर ताजबंद गावानजीक आल्यानंतर शिवनेरी हॉटेलनजीक भरधाव ट्रकने (के.ए. ३२ ए. ए. ६७५८) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एक गंभीर तर इतर जखमी झाले आहेत. त्यातील एकला लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी अहमदपूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. कारचे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक जप्त केला आहे.