ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 17 - शहरातील उप-विभागीय कार्यालयासमोर एका संस्थेची नोंदणी रद्द करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिलांच्या पेंडालला गुरुवारी रात्री अज्ञातांनी रॉकेल टाकून आग लावली. यातून महिललांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उदगीर येथील बीदर रेल्वे गेटनजीक राहणारी सविता रमेश बिरादार यांच्यासह अन्य महिला ३० जानेवारीपासून उपविभागीय कार्यालयासमोर पेंडाल टाकून उपोषणास बसल्या आहेत. सिध्दार्थ इंडस्ट्रियल को-आॅप-सोसायटी लि. या संस्थेची नोंदणी रद्द करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाविरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्या महिलांनी प्रशासनाकडे केली आहे.
उपविभागीय कार्यालयासमोर पेंडाल टाकून उपोषणाला बसलेल्या पेंडाललाच अज्ञात व्यक्तिंनी गुरुवारी रात्री रॉकेल टाकून पेटवून दिले. उपोषणकर्त्या सविता बिरादार यांच्यासोबत शांता बिरादार, माया शिंदे या महिला उपोषणस्थळी मुक्कामासाठी होत्या. पेंडालमध्ये या सर्व महिला गाढ झोपेत असताना अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी पेंडाल आणि गाद्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले. पेंडालला आग लागल्यामुळे उपोषणकर्त्या महिलांच्या गाद्या, सतरंज्या आणि चादरी जळून खाक झाल्या आहेत. शिवाय सविता बिरादार यांच्या साडीने पेट घेतला होता. मात्र, त्यात त्या बालंबाल बचावल्या.
या प्रकरणी शुक्रवारी उपोषणकर्त्या महिलांनी फिर्याद दाखल केली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.