लातूर : नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली असून, रुग्णाला क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात. नोव्हेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत या उपक्रमांतर्गत २ हजार २७५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण ठणठणीत झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ. फुलारी म्हणाले, क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने नियमित औषध घेतल्यानंतर क्षयरोग बरा होता. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. तपासण्या करून रोगाचे निदान केले गेले. त्यानंतर उपचार केल्यानंतर २ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात अहमदपूर १९४, औसा १३९, चाकूर ९२, देवणी ५८, जळकोट ७३, लातूर शहर ७७८, लातूर ग्रामीण ४३३, निलंगा २०४, रेणापूर ७४, शिरूर अनंतपाळ ३४, उदगीर १९६ आदी २ हजार २७५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सद्य:स्थितीत अहमदपूर तालुक्यात ८०, औसा ५८, चाकूर ४२, देवणी २८, जळकोट ४२, लातूर शहर ३५२, लातूर ग्रामीण २१२, निलंगा ८८, रेणापूर ३२, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ८२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचीही प्रकृती आता सुधारली असून, लवकरच ते क्षयमुक्त होतील, असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. फुलारी यांनी सांगितले.
क्षयरुग्णांवर मोफत उपचार... क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्षयरोग विभागाच्या वतीने समुपदेशन करून जनजागृती केली जाते. ज्या रुग्णांना क्षयरोग झाला, अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असेही डॉ. फुलारी यांनी सांगितले.