लातूर : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेल्या अजय आणि विजय राडकर या जुळ्या भावंडांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्यांनी गुणही जुळेच मिळविले आहेत. दोघा भावंडांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत.
परळी वैजनाथ येथील राडकर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. वडील केशवराव राडकर यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. ते शेती करून आपल्या मुलांना अधिकारी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. यासाठी त्यांनी शिक्षणासाठी आपल्या जुळ्या मुलांना लातुरातील जयक्रांती माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीसाठी प्रवेश दिला. यासाठी त्यांनी लातुरात भाड्याची खोली करून दिली आणि खानावळही लावली.
दोघेही नित्यनेमाने शाळेत येत असत. दोघेही दररोज अभ्यास करीत असत. काही अडचण असेल तर शिक्षकांच्या मोबाइलवरून वडिलांशी बोलत असत. मात्र, त्यांनी मोबाइल वापरण्याचे कटाक्षाने टाळले. त्यांच्या आवडी-निवडी सारख्या, लहानपणापासून अभ्यासात हुशार...यंदा त्यांनी दहावीची परीक्षा दिली. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जुळ्या असलेल्या अजय आणि विजय यांनी ९७ टक्के जुळेच गुण मिळविले आहे, असे सहशिक्षक गणपत माने यांनी सांगितले. यशाबद्दल त्यांचे संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
स्वंयशिस्तीमुळेच सिद्ध झाली गुणवत्ता...लातुरात भाड्याची खोली करून देत वडिलांनी जुळ्या असलेल्या अजय आणि विजयला शिक्षणासाठी ठेवले होते. दररोज ते एकत्र शाळेत जायचे. भोजनासाठीही खानावळीवर एकत्रच जात असत. खोलीवर घरातला वडीलधारी व्यक्ती नाही. अशा स्थितीतही त्यांनी स्वत:साठी स्वंयशिस्त महत्त्वाची आहे, ही खूणगाठ बांधली. याच स्वयंशिस्तीने त्यांनी दहावीत ९७ टक्के गुण मिळवीत गुणवंत ठरले आहेत.